Thursday, July 5, 2012

तुला विसरण्यासाठी

तुला विसरण्यासाठी
पट सोंगट्या खेळते;
अकांताने घेता दान
पटालाही घेरी येते!

असे कसे एकाएकी
फासे जळले मुठीत
कशा तुझ्या आठवणी
उभ्या कट्टीत.. कट्टीत!

दिला उधळुन डाव
आणि निघाले कुठेही
जिथे तुझे असें…
तुजे असे कांही नाही!

द्रुष्टी ठेविली समोर,
चालले मी ’कुठेही’त;
कुठेही च्या टोकापाशी
उभी मात्र तुझी मुर्त!

वाट टाकली मोडुन
आणि गाठला मी डोह;
एक तोच कनवाळु
माझे जाणिल ह्रुदय!

नांव तुझे येण्याआधी
दिला झोकुन मी तोल;
डोह लागला मिटाया
तुझी होऊन ओंजळ!!

- इंदिरा संत

No comments:

Post a Comment