Saturday, April 28, 2012

उत्तरायण


पायऱ्या उतरता  उतरता 
हलकेच  ठेच  लागते 
आणि  आठवणींच्या  गाभाऱ्याला
उमाळा येतो

गर्द  झाडीतल्या  आठवणी 
फिरत  फिरत  पुन्हा  
एका  क्षणी  एकवटतात 
जेव्हा  भानावर  येत  मन 
तेव्हा  पायऱ्या उतरून  झालेल्या  असतात

त्या  जगातलं  मन 
या  जगात  स्थिरावत  
एक बिंदू चमकतो
आणि  आठवणीतला  मोहर पुन्हा  बहरतो

पायऱ्या  उतरताना  
उतरणीच   नैराश्य  नसत 
कारण , कारण  
दक्षिणायनात  रमलेल्या  मनाला 
कळतच नाही  कधी उत्तरायण  सामावत
सिनेमा - उत्तरायण

Wednesday, April 25, 2012

प्रेमाचा गुलकंद

बागेतुनि वा बाजारातुनि कुठुनि तरी 'त्या'ने
गुलाबपुष्पे आणुनि द्यावित 'तिज'ला नियमाने!

कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते?
तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते!


गुलाब कसले? प्रेमपत्रिका लालगुलाबी त्या!
लाल अक्षरे जणु लिहिलेल्या पाठपोट नुसत्या!


प्रेमदेवता प्रसन्न होई या नैवेद्याने!
प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणति नवतरणे!


कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा!
परि न सोडला तिने आपुला कधिही मुग्धपणा!


या मौनातच त्यास वाटले अर्थ असे खोल!
तोहि कशाला प्रगत करी मग मनातले बोल!


अशा तर्हेने मास लोटले पुरेपूर सात,
खंड न पडला कधी तयाच्या नाजुक रतिबात!


अखेर थकला! ढळली त्याचि प्रेमतपश्चर्या,
रंग दिसेना खुलावयाचा तिची शांत चर्या!


धडा मनाचा करुनि शेवटी म्हणे तिला, 'देवी!
दुजी आणखी विशेषणे तो गोंडस तिज लावी.


'बांधित आलो पूजा मी तुज आजवरी रोज!
तरि न उमगशी अजुनि कसे तू भक्तांचे काज?


गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले
सांग तरी सुंदरी, फुकट का ते सगळे गेले?'


तोच ओरडुनि त्यास म्हणे ती, 'आळ वृथा हा की!
एकही न पाकळी दवडली तुम्ही दिल्यापैकी'


असे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी
क्षणात घेउनि ये बाहेरी कसलीशी बरणी!


म्हणे, 'पहा मी यात टाकले ते तुमचे गेंद,
आणि बनविला तुमच्यासाठी इतुका गुलकंद!


कशास डोळे असे फिरविता का आली भोंड?
बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोंड!'


क्षणैक दिसले तारांगण त्या,-परि शांत झाला!
तसाच बरणी आणि घेउनी खांद्यावरि आला!!


'प्रेमापायी भरला' बोले, 'भुर्दंड न थोडा!
प्रेमलाभ नच! गुलकंद तरी कशास हा दवडा?'


याच औषधावरी पुढे तो कसातरी जगला,
ह्रदय थांबुनी कधीच नातरि तो असता 'खपला'!


तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेमनिराशेने
'प्रेमाचा गुलकंद' तयांनी चाटुनि हा बघणे!

-प्र.के.अत्रे

ही चाल तुरुतुरु.....

ही चाल तुरुतुरु
उडती केस भुरुभुरु
डाव्या डोळ्यांवर बट्ट ढळली
जशी मावळत्या उन्हात
केवड्याच्या बनात
नागीन सळसळली ! २ !
इथ कुणी आसपास ना
डोळ्यांच्या बोनात हास ना
तु जरा मा़झ्याशी बोल ना
ओठांची मोहर खोलना,
तु लगबग जाता
माग वळुन पाहता
वाट पावलात अडखळली
जशी मावळत्या उन्हात
केवड्याच्या बनात नागीन सळसळली !!
उगाच भुवयी ताणुन 
उगाचा रुसवाआणुन 
पदर चाचपुण हाताण
ओंठ जरा दाबीशी दातान,
हा राग जीवघेना होता
खोटा तो बहाना
आता माझी मला भुल कळली
जशी मावळत्या उन्हात
केवड्याच्या बनात नागीन सळसळली !!
ही चाल तुरुतुरु
उडती केस भुरुभुरु
डाव्या डोळ्यांवर बट्टा ढळली
जशी मावळत्या उन्हात
केवड्याच्या बनात नागीन सळसळली !!
गायक    जयवंत कुलकर्णी 





कणा

ओळखलत का सर मला....पावसात आला कोणी 
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून 
गंगामाई पाहुनी आली गेली घरट्यात राहून

माहेरवाशीण  पोरीसारखी चार भिंतीत राहिली
मोकल्याहाती जाईल कशी बायको मात्र वाचली

भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले
प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी तेवढे ठेवले

कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे

खिशाकडे हात जाताच  हसत  हसत  उठला
पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा

प्रेम कर भिल्लासा्रखं बाणावरती खोचलेलं..

पुरे झाले चंद्र-सुर्य , पुरे झाल्या तारा
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा 

मोरासारखा छातीकाढून उभा राहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा 
सांग तिला . . .
तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा

शेवाळलेले शब्द आणिक यमक-छंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण इन्द्रधनु बांधील काय?
उन्हाळ्यात्ल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत 
जास्तित-जास्त १२ महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहिल काय?

म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वीवेळ 
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं

प्रेम कर भिल्लासारखं 
बाणावरती खोचलेलं 
मातीमध्ये उगवून सुध्धा 
मेघापर्यंत पोहोचलेलं 

शब्दांच्या या धुक्यामधे अडकुनकोस
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस 
उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं
प्रेम कर भिल्लासा्रखं बाणावरती खोचलेलं...
कुसुमाग्रज