Monday, December 30, 2013

पैठणी

फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करुन
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग तिचा सुंदर धानी

माझी आजी लग्नामध्ये
हीच पैठणी नेसली होती
पडली होती सा-यांच्या पाया
हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभवती
दरवळणारा सुष्म वास
ओळखीची.. अनोळखीची..
जाणीव गुढ़ आहे त्यास

धूर कापूर उदबत्यांतून
जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले
एक तन.. एक मन..
माखली बोटे
पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची चमेलीची
आरास पदराआडून हसली

वर्षामागुन वर्षे गेली
संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत
एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून
अवघे आयुष्य उलगडत गेले
सौभाग्य मरण आले
आजीचे माझ्या सोने झाले

कधीतरी ही पैठणी
मी धरते ऊरी कवळुन
मऊ रेशमी स्पर्शामध्ये
आजी भेटते मला जवळुन
मधली वर्षे गळुन पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यानो
आजीला माझ्या कुशल सांगा

– शांता शेळके

Monday, December 23, 2013

पावसाच्या धारा

पावसाच्या धारा येती झरझरा
झाकळले नभ, वाहे सोसाट्याचा वारा

रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागोजागीं खाचांमध्ये तुडुंबले जळ

झळके सतेज, ढगांवर वीज
नर्तकीच आली गमे लेवुनिया साज

झोंबे अंगा वारे, काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया बसली पाखरें
हर्षलासे फार, नाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे डोकावून खार

झाडांचिया तळी, डोईवरी मारा
रानातील गुरे शोधिती निवारा

नदीलाही पूर, लोटला अपार
फोफावत धावे जणू नागीणच थोर

झाडांची पालवी, चित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसें रंगदार छबी

थांबला ओझर, उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश

किरण कोंवळे भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें पक्षीजात खुले

धरणी हासली, सुस्नात जाहली
वरुणाच्या वर्षावाने मनी संतोषली

 – शांता शेळके

Monday, December 16, 2013

अंगाई

कर आता गाई गाई
तुला गाते मी अंगाई
आज माझ्या बाहुलीची
झोप कुणी नेली बाई ?

बोळक्यांची उतरंडी
लुटुपुटीची चूल
आवरले आहे बाई
आता कुठे घरकुल !

काम सारे उरकता
थकला ग माझा जीव
नको छळू तूही राणी
येऊ दे ना जरा कीव ?

नीज नीज लडिवाळे
नको रडू, देते झोका
उभा बागुल दाराशी
सांग त्यास बोलावू का ?
-शांता शेळके