Monday, February 25, 2013

तुकोबाच्या भेटी शेक्स्पीअर आला

तुकोबाच्या भेटी| शेक्स्पीअर आला|
तो झाला सोहळा| दुकानात ||
जाहली दोघांची| उराउरी भेट|
उरातले थेट| उरामध्ये ||
तुका म्हणे "विल्या,| तुझे कर्म थोर |
अवघाची संसार| उभा केला" ||
शेक्स्पीअर म्हणे, | "एक ते राहिले
तुवा जे पाहिले | विटेवरी"||
तुका म्हणे, "बाबा| ते त्वा बरे केले|
त्याने तडे गेले| संसाराला ||
विठ्ठल अट्टल |त्याची रीत न्यारी |
माझी पाटी कोरी | लिहोनिया"||
शेक्स्पीअर म्हणे,| "तुझ्या शब्दांमुळे
मातीत खेळले| शब्दातीत"||
तुका म्हणे, "गड्या| वृथा शब्दपीट |
प्रत्येकाची वाट |वेगळाली ||
वेगळीये वाटे| वेगळाले काटे |
काट्यासंगे भेटे| पुन्हा तोच||
ऐक ऐक वाजे| घंटा ही मंदिरी|
कजागीण घरी| वाट पाहे"||
दोघे निघोनिया| गेले दोन दिशा|
कवतिक आकाशा| आवरेना||
- विंदा करंदीकर



@१२:२२ 

Monday, February 18, 2013

भंगु दे काठिन्य माझे

भंगु दे काठिन्य माझे
आम्ल जाउ दे मनीचे
येऊ दे वाणीत माझ्या
सूर तुझ्या आवडीचे

धैर्य दे अन नम्रता दे
पाहण्या जे जे पहाणे
वाकू दे बुध्दीस माझ्या
तप्त पोलादाप्रमाणे

जाऊ दे 'कार्पण्य' 'मी' चे
दे धरु सर्वांस पोटी
भावनेला येऊ देगा
शास्त्र काट्याची कसोटी
- बा. सी. मर्ढेकर

Monday, February 11, 2013

जगण्यामध्ये ब्रम्हानंद

बरगड्यांच्या तुरुंगातून
मी हृदयाला मुक्त केले;
जिथे जिथे धमनी आहे
तिथे माझे रक्त गेले.

दिक्कालाच्या जबड्यामधील
लवलवणारी जीभ मी;
आसक्तीच्या गर्भामधील
धगधगणारे बीज मी.

माझ्या हातात महायंत्र;
माझ्या मुखात महामंत्र.

सगळे मिळून सगळ्यांसाठी
मरण्यातही मौज आहे;
सगळे मिळून सगळ्यांसाठी
जगण्यामध्ये ब्रम्हानंद.
- विंदा करंदीकर

@१:४६ 

Monday, February 4, 2013

झोपली गं खुळी बाळे

झोपली गं खुळी बाळे
झोप अंगाईला आली
जड झाली शांततेची
पापणी ह्या रित्या वेळी

चैत्र बघतो वाकून
निळ्या नभांतून खाली
आणि वाऱयाच्या धमन्या
धुकल्या गं अंतराळी

शब्द अर्थाआधी यावा
हे तो ईश्वराचे देणें
पेंगणाऱ्या प्रयासाला
उभ्या संसाराचे लेणे

चैत्र चालला चाटून
वेड्या सपाट पृथ्वीला
आणि कोठेतरी दूर
खुजा तारा काळा झाला

आता भ्यांवे कोणी कोणा
भले होवो होणाऱ्याचे
तिरीमिरीत चिंचोळ्या
काय हाकारावे वेचे

चैत्र चढे आकाशात
नीट नक्षत्र पावली
आणि निळ्या वायूतून
वाट कापी विश्ववाली

वेड्याविद्र्या नि वाकड्या
मनाआड मने किती
चाळणीत चाळणी अन
विचारांत तरी माती

चैत्रबाप्पा उद्या या हो
घेऊनीया वैशाखाला
आंबोणीच्या मागे का गं
तुझा माझा चंद्र गेला?

आंबोणीच्या मागे का गं
अवेळी का चंद्र गेला?

- बा.सी.मर्ढेकर