Monday, October 29, 2012

हे बरे नाही

हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही

जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही

ऐक तू ज़रा माझे…सोड मोह स्वप्नांचा
आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही

जाहली न कोणाची सांग राखरांगोळी ?
आपुलीच रांगोळी काढ़णे बरे नाही

आज मोकळे बोलू ! आज मोकळे होऊ !
जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही

कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता…
हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही

मैफिलीत या माझ्या पहातेस का खाली ?
हाय, लाजणारयाने जागणे बरे नाही…

- सुरेश भट

Monday, October 22, 2012

कातरवेळी

कातरवेळी बसलो होतो
आठवणींचा पिंजत कापूस
तशात पाउस…..

ठुसठुसणारे घाव पुराणे
वीस्कटलेले डाव पुराणे
अन पुराणे काही उखाणे
सुटता झालो उगाच भावुक
तशात पाउस…..

त्यात कुठुनसा आला वारा
कापुस घरभर झाला सारा
पसार्‍यात त्या हरवुन गेलो
कधी अन कसा कुणास ठावुक
तशात पाउस…..

- गुरु ठाकुर

Monday, October 15, 2012

राधा ही बावरी


रंगात रंग तो श्यामरंग, पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून तान, विसरुन भान, ही वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनि होई
राधा ही बावरी, हरीची, राधा ही बावरी

हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना
चिंब चिंब देहावरुनी श्रावणधारा झरताना
हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगुन जाई
हा उनाड वारा गूज प्रीतिचे कानी सांगुन जाई
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनि होई
राधा ही बावरी, हरीची, राधा ही बावरी

आज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावती
तुज सामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई
हा चंद्र चांदणे ढगांआडुनि प्रेम तयांचे पाही
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनि होई
राधा ही बावरी, हरीची, राधा ही बावरी 
-
गायक: स्वप्निल बांदोडकर
संगीतकार: अशोक पत्की
गीतकार: अशोक पत्की
संग्रह : तू माझा किनारा

Monday, October 8, 2012

दैना

सडलेल्या पंखांनांही
उडण्याचा लागे ध्यास
हाच माझा थोर गुन्हा
हाच माझा रे हव्यास.

आकाशाची निळी भाषा
ऐकता न उरे पोच;
आणि गजांशी झुंजता
झिजे चोंच झिजे चोंच!

जाणिवेच्या पिंजर्‍यात
किंचाळत माझी मैना;
तरी मुके तिचे दु:ख,
हीच दैना हीच दैना.
- विंदा करंदीकर

Monday, October 1, 2012

जोगीण

साद घालशील
तेव्हाच येईन
जितकं मागशील
तितकच देईन.

दिल्यानंतर
देहावेगळ्या
सावली सारखी
निघुन जाईन.

तुझा मुगूट
मागणार नाही
सभेत नातं
सांगणार नाही.

माझ्यामधल्या
तुझेपणात
जोगीण बनून
जगत राहीन
-कुसुमाग्रज