Monday, July 30, 2012

तवंग

शेतावरती इथे नाचणी कशी बिलगते पायाभवती;
थरथरणारी नाजुक पाती इतुके कसले गूज सांगती

इवली इवली ही कारंजी, उडती ज्यांतुन हिरव्या धारा;
हिरवे शिंपण अंगावरती, रंग उजळतो त्यांतुन न्यारा

त्या रंगाची हिरवी भाषा, अजाण मी मज मुळि न कळे तर;
तरंगतो परि मनोमनावर त्या रंगाचा तवंग सुंदर….!!

- इंदिरा संत

Friday, July 20, 2012

आई

कळ्या माझ्या आनंदाच्या
साठवील्या माझ्याकडे,
फुलवाया तुझ्यापुढे.

आसवे मी साठवली
पापणीच्या काठोकाठ,
तुझ्यापाशी देण्या वाट.

ठरवले मानापाशी,
बोलावयाचे कितितरी,
निजुनिया मांडीवरी.

किती लांब वाटे काळ,
आई कधी भेटशील?
जीव झाल उतवीळ.

- इंदिरा संत

Tuesday, July 10, 2012

वारा केशराचा आला

प्रभातीच्या केशराची कुणि उधळली रास
आणि वाऱ्यावर रंगला असा केशरी उल्हास!

रंगा गंधाने माखून झाला सुखद शितळ
आणि ठुमकत चालला शीळ घालीत मंजुळ!

हेलावत्या तळ्यावर वारा केशराचा आला
लाटा -लहरी तरंगानी उचंबळुन झेलला!

नीळे आभाळ क्षणात तळ्यामधे उतरले!
एकाएकी स्तब्ध झाले!!

नऊ सुर्याची मुद्रीका सीतामाईने टाकली
इथे काय प्रकटली!

तळ्याकाठी माझे घर , उभी दारात रहाते
हेलावत्या केशरात स्वप्ने सुंदर पहाते

केशराचे मंज माझा मनावर चमकले!
आली किरणे तळ्याशी दारातुन आत आले

मनातील बिंदु बिंदि निगुतीने गोळा केले
तळ्यावरच्य़ा शेल्यात घट्ट गाठीने बांधले

- इंदिरा संत

Thursday, July 5, 2012

तुला विसरण्यासाठी

तुला विसरण्यासाठी
पट सोंगट्या खेळते;
अकांताने घेता दान
पटालाही घेरी येते!

असे कसे एकाएकी
फासे जळले मुठीत
कशा तुझ्या आठवणी
उभ्या कट्टीत.. कट्टीत!

दिला उधळुन डाव
आणि निघाले कुठेही
जिथे तुझे असें…
तुजे असे कांही नाही!

द्रुष्टी ठेविली समोर,
चालले मी ’कुठेही’त;
कुठेही च्या टोकापाशी
उभी मात्र तुझी मुर्त!

वाट टाकली मोडुन
आणि गाठला मी डोह;
एक तोच कनवाळु
माझे जाणिल ह्रुदय!

नांव तुझे येण्याआधी
दिला झोकुन मी तोल;
डोह लागला मिटाया
तुझी होऊन ओंजळ!!

- इंदिरा संत