Monday, January 28, 2013

जोगिया

कोन्यात झोपली सतार, सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग,
दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली
तबकात राहीले देठ, लवंगा, साली

झूंबरी निळ्या दीपात ताठली वीज
का तुला कंचनी, अजुनी नाही नीज?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलूनी तू दार दडपिलें पाठी

हळूवार नखलीशी पुन: मुलायम पान
निरखीसी कुसर वर कलती करुनी मान
गुणगुणसी काय ते?- गौर नितळ तव कंठी -
स्वरवेल थरथरे, फूल उमलले ओठी.

साधता विड्याचा घाट उमटली तान,
वर लवंग ठसता होसी कशी बेभान?
चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने,
"का नीर लोचनी आज तुझ्या गं मैने?"

त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग
हालले, साधला भावस्वरांचा योग
घमघमे जोगिया दवांत भिजुनी गाता
पाण्य़ात तरंगे अभंग वेडी गाथा

"मी देह विकुनीया मागून घेते मोल,
जगविते प्राण हे ओपुनीया 'अनमोल',
रक्तांत रुजविल्या भांगेच्या मी बागा,
ना पवित्र, देही तिळाएवढी जागा.

शोधीत एकदा घटकेचा वि़श्राम
भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम,
सावळा तरुण तो खराच गं वनमाली
लाविते पान...तो निघून गेला खाली

अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव
पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव;
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
'मम प्रीति आहे जडली तुजवर राणी'

नीतिचा उघडिला खुला जिथें व्यापार
बावळां तिथें हा इष्कां गणितो प्यार;
हांसून म्हणाल्यें, 'दाम वाढवा थोडा...
या पुन्हा, पान घ्या...' निघून गेला वेडा!

राहिलें चुन्याचे बोट, थांबला हात,
जाणिली नाही मी थोर तयाची प्रीत,
पुन:पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला
तो कशास येईल भलत्या व्यापाराला?

तो हाच दिवस, हीच तिथी, ही रात,
ही अशीच होत्यें बसलें परि रतिक्लांत,
वळुनी न पाहतां, कापित अंधाराला
तो तारा तुटतो - तसा खालती गेला.

हा विडा घडवुनी करितें त्याचे ध्यान,
त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान;
ही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगे
वर्षात एकदा असा 'जोगिया' रंगे."

- ग.दि.माडगूळकर

Monday, January 21, 2013

तुतारी

एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी

अवकाशाच्या ओसाडीतले
पडसाद मुके जे आजवरी
होतील ते वाचाल सत्वरी
फुंक मारीता जिला जबरी
कोण तुतारी ती मज देईल?

रुढी, जुलूम यांची भेसूर
संताने राक्षसी तुम्हाला
फाडूनी खाती ही हतवेला
जल्शाची का? पुसा मनाला!
तुतारीने ह्या सावध व्हा तर!

चमत्कार! ते पुराण तेथुनी
सुंदर, सोज्वळ गोड मोठे
अलिकडले ते सगळे खोटे
म्हणती धरुनी ढेरी पोटे
धिक्कार अशा मूर्खांलागुनी

जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध!ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी

प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा?
विक्रम काही करा, चला तर!

धार धरलिया प्यार जीवावर
रडतील रडोत रांडापोरे
गतशतकांची पापे घोरे
क्षालायाला तुमची रुधिरे
पाहिजेत रे! स्त्रैण न व्हा तर!

धर्माचे माजवुनी अवडंबर
नीतीला आणिती अडथळे
विसरुनीया जे जातात खुळे
नीतीचे पद जेथे न ढळे
धर्म होतसे तेथेच स्थ्रिर

हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर
शूरांनो! या त्वरा करा रे!
समतेचा ध्वज उंच धरा रे!
नीतीची द्वाही पसरा रे!
तुतारीच्या ह्या सुराबरोबर

नियमन मनुजासाठी, मानव
नसे नियमनासाठी, जाणा;
प्रगतीस जर ते हाणी टोणा
झुगारुनी दे देऊनी बाणा
मिरवा नीज ओजाचा अभिनव!

घातक भलत्या प्रतिबंधांवर
हल्ला नेण्या करा त्वरा रे!
उन्न्तीचा ध्वज उंच धरा रे!
वीरांनो! तर पुढे सरा रे
आवेशाने गर्जत हर-हर!

पूर्वीपासूनी अजुनी सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती
संप्रति दानव फार माजती
देवावर झेंडा मिरवीती!
देवांच्या मदतीस चला तर

- केशवसुत

Monday, January 14, 2013

सब घोडे बारा टक्के!

जितकी डोकी तितकी मते
जितकी शिते तितकी भूते;
कोणी मवाळ कोणी जहाल
कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढीले कोणी घट्ट;
कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!


गोड गोड जुन्या थापा
(तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग
जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार?
आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्या मधे
पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के
सब घोडे बारा टक्के!


जिकडे सत्ता तिकडे पोळी
जिकडे सत्य तिकडे गोळी;
(जिकडे टक्के तिकडे टोळी)
ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता;
पुन्हा पुन्हा जुनाच वार
मंद घोडा जुना स्वार;
याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!

सब घोडे! चंदी कमी;
कोण देईल त्यांची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी;
कोण देईल माझा हरी?
कोणी तरी देईन म्हणा
मीच फसविन माझ्या मना!
भुकेपेक्षा भ्रम बरा;
कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्ऱ्या कोणी छक्के;
सब घोडे बारा टक्के!

- विंदा करंदीकर

@५:१६ 

Monday, January 7, 2013

माझे माहेर पंढरी

माझे माहेर पंढरी , आहे भिवरेच्या तीरी

बाप आणि आई , माझी विठठल रखुमाई
माझे माहेर पंढरी ...

पुंडलीक राहे बंधू , त्याची ख्याती काय सांगू
माझे माहेर पंढरी ...

माझी बहीण चंद्रभागा , करीतसे पापभंगा
माझे माहेर पंढरी ...
एका जनार्दनी शरण , करी माहेरची आठवण
- संत एकनाथ