Monday, August 26, 2013

किलबिललेले उजाडताना

किलबिललेले उजाडताना
ओठ उगवतीचा थरथरला
गुलाबलेला ओललालसर

तुंडुंबलेले
संथ निळेपण
पसरत गेले चार दिशांना
तांबुसवेडे

हळुहळु मग नि:स्तब्धातुन
स्वप्ने उडाली गुलाल घेऊन
लालचुटकश्या चोचीमध्ये
पिंजर-पंखी,
आणिक नंतर
’आप’ खुशीने अभ्र वितळले
उरले केशर
आणि भराभर
उधळण झाली आकाशावर
आकारांची
रंगदंगल्या.

नाहि उमगले
केव्हा सरला रजतराग हा
ही अस्ताई,
आणि उमटला रौप्यतराणा
झगमगणा-या जलद लयीतील
... असा विसरलो, विसावलो अन
नीरवतेच्या गुप्त समेवर
आणिक नंतर
न कळे कैसी
मनात माझ्या - काहि न करता-
जाणिव भरली कृतार्थतेची
-  विंदा करंदीकर

Monday, August 19, 2013

ती गेली तेव्हा

ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता,
मेघात अडकली किरणे हा सुर्य सोडवित होता.

तशी सांज आमुच्या दारी येउन थबकली होती,
शब्दात अर्थ उगवावा,अर्थातून शब्द वगळता..

ती आई होती म्हणुनी घन व्याकुळ मी ही रडलो,
त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवित होता.

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे,
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता…
-कवी ग्रेस


Monday, August 12, 2013

फ़ुलपाखरे

गवतावरची ओंजळभर फ़ुलपाखरे
इकडून तिकडे टाकता येतात.
क्वचित सुखावणारी वारयाची डोंगरशीळ
आली तर नक्की संध्याकाळ झालेली असते.
समोरच्या पितळी खांबात कशाचेही
प्रतिबिंब पडते;
आता सनई सोडूनच्या देवळाचे.

कथेची एक आठवण माझ्या फ़ार जिव्हारी
लागून राहिलीय.
कथाही किती मोकळ्या असतात! नाही?
पाणी शिंपडलेली खूपखूपशी जाईची फ़ुलें
अलगद उचलून ठेवावीत उशीवर;
थोडी उरली तर वेशीवर.
कथेतील पात्र संकटात सापडले म्हणून
धारांनी रडणारी बाई आठवते मला.

संध्याकाळ. फ़ुलपाखरें. गवतांचे अस्वस्थ
आविर्भाव. एकत्र जमून आलेल्या लहरींचे
सूक्ष्म रुप. पितळी खांबात दडलेल्या
रांगोळीच्या वेली. नि:संदीग्ध अक्षरांचे
खाली वाकुन पाहने;सगळ्या गवतांचीच
फ़ुलपाखरे होऊन जाणें..

भूमीच्या संबंधीचा तर नसेलना आपपरभाव?
ऋतू प्राप्त झालेल्या जोगिणीचा स्वभाव?
आठवून आठवून विरलेला संग इथे
सुटतो, तिथे तुटतो- डोंगरात जमलेल्या काळोखासारखी
पायाशी आलेली फ़ुलपाखरें.
गवत वाढले शरीरावर की आपोआपच
माझाही पालटेल रंग.
-कवी ग्रेस

Monday, August 5, 2013

ज्याचे त्याने घ्यावे

ज्याचे त्याने घ्यावे
ओंजळीत पाणी
कुणासाठी कोणी
थांबू नये!
असे उणे नभ
ज्यात तुझा धर्म
माझे मीही मर्म
स्पर्शू नये
-कवी ग्रेस