Monday, April 29, 2013

कुब्जा

अजून नाही जागी राधा
अजून नाही जागे गोकुळ
अशा अवेळी पैलतीरावर
आज घुमे का पावा मंजुळ
मावळतीवर चंद्र केशरी
पहाटवारा भवती भनभन
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकुन अपुले तनमन
विश्वच अवघे ओठ लावून
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यामधुनी थेंब सुखाचे....
हे माझ्यास्तव.... हे माझ्यास्तव
- इंदिरा संत

Monday, April 22, 2013

प्रीति हवी तर

प्रीति हवी तर जीव आधि कर अपुला कुरबान,
प्रीति हवी तर तळहातावर घे कापुनि मान !

तलवारीची धार नागिणी लसलसती प्रीत,
याद ठेव अंगार जगाला लाविल निमिषांत !

प्रीति निर्मिली तुला वाटते का दुबळ्यासाठी?
प्रीतिदेवि जगदेकवीर जो जाय तयापाठी !

नव्हे प्रीतिला रंग लाविला लाल गुलाबांचा,
परि रुधिराचा, धडधडणाऱ्या जळत्या जीवाचा.

गुल गुल बोले प्रीति काय ती? काय महालांत?
प्रीति बोलते काळ घालिता कलिजाला हात !

स्त्रैणपणाच्या चार भावना नच पचती ज्याला
हीन जिवाने घेउ नये त्या जहरी प्याल्याला !

सह्य जिवाला होय जाहला जरि विद्युत्पात,
परी प्रीतिचा घात भयंकर दुसरा कल्पांत !

जीवंतपणी मरण घेउनी फिरणे जगतात;
साठविली ब्रम्हांडदाहिनी दाहकता यांत !
- बालकवी

Monday, April 15, 2013

अनंत

अनंत तारा नक्षत्रे ही अनंत या गगनात
अनंत दीप्ती, अनंत वसुधा, हे शशिसूर्य अनंत.
वरती खाली सर्व साठले वातावरण अनंत,
माप कशाचे, कुणा मोजिता, सर्व अनंत अनंत.
कितेक मानव झटती, करिती हाडाचेही पाणी,
अनंत वसुधा आजवरी हो परी मोजली कोणी!
म्हणोत कोणी 'आम्ही गणिला हा ग्रह- हा तारा,'
परंतु सांगा कुणी मोजिला हा सगळाच पसारा?
विशाल वरती गगन नव्हे, हे विश्वाचे कोठार,
उदात्ततेचा सागर हा, चिच्छांतीचा विस्तार.
कुणी मोजिला, कुणास त्याची लांबीरूंदी ठावी?
फार कशाला दिग्वनिंताची तरी कुणी सांगावी?
अनंत सारे विश्व जाहले अनंतात या लीन,
क्षुद्र मानवा, सांग कशाचा बाळगिसी अभिमान?
तव वैभव हे तुझे धनी ही, हे अत्युच्च महाल,
जातिल का गगनास भेदूनि? अनंत का होतील?
तुझ्या कीर्तिचे माप गड्या का काळाला मोजील!
ज्ञान तुझे तू म्हणशी 'जाइल', कोठवरी जाईल?
'मी' 'माझे' या वृथा कल्पना, तू कोणाचा कोण?
कितेक गेले मी मी म्हणता या चक्री चिरडून.
- बालकवी

Monday, April 8, 2013

कोठुनि येते मला कळेना

कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला
काय बोचते ते समजेना
हृदयाच्या अंतर्हृदयाला ।।

येथे नाही तेथे नाही,
काय पाहिजे मिळावयाला?
कुणीकडे हा झुकतो वारा?
हाका मारी जीव कुणाला?

मुक्या मनाचे मुके बोल हे
घरे पाडिती पण हृदयाला
तीव्र वेदना करिती, परि ती
दिव्य औषधी कसली त्याला !

- बालकवी

Monday, April 1, 2013

सांग मला रे सांग मला

सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला ?

आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी
तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती, बनवायाला सहज तिला !
आई आवडे अधिक मला !

गोजिरवाणी दिसते आई, परंतु भित्री भागुबाई
शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला !
आवडती रे वडिल मला !

घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन्‌ चॉकलेट तर, बाबा घेती रस्त्याला !
आवडती रे वडिल मला !

कुशीत घेता रात्री आई थंडी, वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला !
आई आवडे अधिक मला !

निजता संगे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी
मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्यांच्या अपुल्या गालाला !
आवडती रे वडिल मला !

आई सुंदर कपडे शिवते, पावडर, तिटी तीच लावते
तीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधुन वेणीला !
आई आवडे अधिक मला !

त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती
कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला !
आवडती रे वडिल मला !

बाई म्हणती माय पुजावी, माणुस ती ना असते देवी
रोज सकाळी नमन करावे हात लावूनी पायाला !
आई आवडे अधिक मला !

बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई !
बाबा येता भिऊनी जाई सावरते ती पदराला !
आवडती रे वडिल मला !

धडा शीक रे तू बैलोबा, आईहुनही मोठ्ठे बाबा
म्हणून आया तयार होती, बाबांसंगे लग्नाला !
आवडती रे वडिल मला !
- ग. दि. माडगूळकर