Monday, January 20, 2014

कविता

शेवटची ओळ लिहीली
आणि तो दूर झाला
आपल्या कवितेपासून
बराचसा थकलेला
पण सुटकेचे समाधानही अनुभवणारा
प्रसूतीनंतरच्या ओल्या बाळंतीणीसारखा
जरा प्रसन्न, जरा शांत
नाही खंत, नाही भ्रांत….

आणि ती कविता नवजात
एकाकी, असहाय, पोरकी
आधाराचे बोट सुटलेल्या
अजाण पोरासारखी
भांबावलेली, भयभीत,
अनुभवणारी एका उत्कट नात्याची
परिणती विपरीत

ती आहे आता पडलेली
कागदाच्या उजाड माळावर
आपल्या अस्तिवाचा अर्थ शोधत
तो मैलोगणती दूर, वेगळ्या विश्वात
संपूर्ण, संतुष्ट, आत्मरत!

 – शांता शेळके

Monday, January 13, 2014

लाडकी बाहुली

लाडकी बाहुली होती माझी एक

मिळणार तशी न शोधूनी दुसऱ्या लाख

किती गोरी गोरी गाल गुलाबच फुलले

हासती केसही सुंदर काळे कुरळे

अंगात शोभला झगा रेशमी लाल

केसांवर फुलले लाल फितीचे फूल

कितीतरी बाहुल्या होत्या माझ्या जवळी

पण तीच सोनुली फार मला आवडती

मी तिजसह गेले माळावर खेळाया

मी लपुनी म्हटले साई-सूट्यो या या

किती शोध-शोधली परी न कोठे दिसली

परतले घरी मी होऊन हिरमुसलेली

वाटते सारखे जावे त्याच ठिकाणी

शोधूनी पहावी पुन्हा पुन्हा ती चिमणी

जाणार कशी पण पाऊस संततधार

खल मुळी न तिजला वर झोंबे फार

पाऊस उघडता गेले माळावरती

गवतावर ओल्या मजला सापडली ती

कुणी गेली होती गाय तुडवूनी तिजला

पाहुनी दशा ती रडूच आले मजला

मैत्रिणी म्हणाल्या काय अहा हे ध्यान

केसांच्या झिपऱ्या रंगही गेला उडून

पण आवडली ती तशीच मजला राणी

लाडकी बाहुली माझी माझी म्हणुनी

- शांता शेळके

Monday, January 6, 2014

मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले

मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले
जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले
जखम जिवाची हलके हलके भरून यावी
तसे फिकटले, फिकट रंग ते मग ओसरले

घेरित आल्या काळोखाच्या वत्सल छाया
दुःखाचीही अशी लागते अनवट माया
आक्रसताना जग भवतीचे इवले झाले
इवले झाले आणिक मजला घेरित आले

मी दुःखाच्या कुपीत आता मिटते आहे
एक विखारी सुगंध त्याचा लुटते आहे
सुखदुःखाच्या मधली विरता सीमारेषा
गाठ काळजातली अचानक सुटते आहे

जाणिव विरते तरीही उरते अतीत काही
तेच मला मम अस्तित्वाची देते ग्वाही
आतुरवाणी धडधड दाबून ह्रुदयामधली
श्वास आवरून मन कसलीशी चाहुल घेई

हलके हलके उतरत जाते श्वासांची लय
आता नसते भय कसले वा कसला संशय
सरसर येतो उतरत काळा अभेद्य पडदा
मी माझ्यातून सुटते, होते पूर्ण निराशय

 – शांता शेळके

Monday, December 30, 2013

पैठणी

फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करुन
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग तिचा सुंदर धानी

माझी आजी लग्नामध्ये
हीच पैठणी नेसली होती
पडली होती सा-यांच्या पाया
हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभवती
दरवळणारा सुष्म वास
ओळखीची.. अनोळखीची..
जाणीव गुढ़ आहे त्यास

धूर कापूर उदबत्यांतून
जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले
एक तन.. एक मन..
माखली बोटे
पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची चमेलीची
आरास पदराआडून हसली

वर्षामागुन वर्षे गेली
संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत
एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून
अवघे आयुष्य उलगडत गेले
सौभाग्य मरण आले
आजीचे माझ्या सोने झाले

कधीतरी ही पैठणी
मी धरते ऊरी कवळुन
मऊ रेशमी स्पर्शामध्ये
आजी भेटते मला जवळुन
मधली वर्षे गळुन पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यानो
आजीला माझ्या कुशल सांगा

– शांता शेळके

Monday, December 23, 2013

पावसाच्या धारा

पावसाच्या धारा येती झरझरा
झाकळले नभ, वाहे सोसाट्याचा वारा

रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागोजागीं खाचांमध्ये तुडुंबले जळ

झळके सतेज, ढगांवर वीज
नर्तकीच आली गमे लेवुनिया साज

झोंबे अंगा वारे, काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया बसली पाखरें
हर्षलासे फार, नाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे डोकावून खार

झाडांचिया तळी, डोईवरी मारा
रानातील गुरे शोधिती निवारा

नदीलाही पूर, लोटला अपार
फोफावत धावे जणू नागीणच थोर

झाडांची पालवी, चित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसें रंगदार छबी

थांबला ओझर, उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश

किरण कोंवळे भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें पक्षीजात खुले

धरणी हासली, सुस्नात जाहली
वरुणाच्या वर्षावाने मनी संतोषली

 – शांता शेळके

Monday, December 16, 2013

अंगाई

कर आता गाई गाई
तुला गाते मी अंगाई
आज माझ्या बाहुलीची
झोप कुणी नेली बाई ?

बोळक्यांची उतरंडी
लुटुपुटीची चूल
आवरले आहे बाई
आता कुठे घरकुल !

काम सारे उरकता
थकला ग माझा जीव
नको छळू तूही राणी
येऊ दे ना जरा कीव ?

नीज नीज लडिवाळे
नको रडू, देते झोका
उभा बागुल दाराशी
सांग त्यास बोलावू का ?
-शांता शेळके

Monday, November 25, 2013

माझे जगणे होते गाणे

जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावरही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी

माझे जगणे होते गाणे
कधी मनाचे कधी जनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नाद तराणे

आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाणे

राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामाधले क्रंदन
अजणातेचे अरण्य केव्हा
केव्हा शब्द शहाणे

जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरले काही
अदृष्यातील आदेशांचे
ओझे फक्त वाहणे
-कुसुमाग्रज

Monday, November 18, 2013

ऋण

पदी जळत वालुका
वर उधाणलेली हवा
जळास्तव सभोवती
पळतसे मृगांचा थवा

पथी विकलता यदा
श्रमुनि येतसे पावला
तुम्हीच कवी हो, दिला
मधुरसा विसावा मला !

अहो उफळला असे
भवति हा महासागर
धुमाळुनि मदांध या
उसळतात लाटा वर,

अशा अदय वादळी
गवसता किती तारवे
प्रकाश तुमचा पुढे
बघुनि हर्षती नाखवे !

असाल जळला तुम्ही
उजळ ज्योति या लावता
असाल कढला असे,
प्रखर ताप हा साहता,

उरात जखमातली
रुधिर-वाहिनी रोधुनी
असेल तुम्हि ओतली
स्वर-घटात संजीवनी !

नकोत नसली जरी
प्रगट स्मारकांची दळे
असंख्य ह्रदयी असती
उभी आपुली देवळे
-कुसुमाग्रज

Monday, November 11, 2013

सोपेच असतात तुझे केस

सोपेच असतात तुझे केस
सोपीच असते लकेर डोळ्यांची
सोप्याच असतात तुझ्या गाठी
कठीण असते तर्‍हा चोळ्यांची
सोपेच असते मानेचे वळण
सोपीच उतरण निमुळत्या पाठीची
सोपेच असते तुझे पाऊल
कठिण असते वाट दाटीची
सोपाच असतो राग, अनुराग
सोपीच असते तुझी कळ
सोप्या सोपस मांड्यामध्ये
दहा हत्तींचे असते बळ...
- विंदा करंदीकर

Monday, November 4, 2013

अखेर कमाई

मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले .
ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले ,
मी फ़क्त मराठ़्यांचा.
आंबेडकर म्हणाले ,
मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद़्गारले ,
मी तर फ़क्त
चित्पावन ब्राम्हणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !
-कुसुमाग्रज