Showing posts with label Kana. Show all posts
Showing posts with label Kana. Show all posts

Wednesday, April 25, 2012

कणा

ओळखलत का सर मला....पावसात आला कोणी 
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून 
गंगामाई पाहुनी आली गेली घरट्यात राहून

माहेरवाशीण  पोरीसारखी चार भिंतीत राहिली
मोकल्याहाती जाईल कशी बायको मात्र वाचली

भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले
प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी तेवढे ठेवले

कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे

खिशाकडे हात जाताच  हसत  हसत  उठला
पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा