Showing posts with label सुरेश भट. Show all posts
Showing posts with label सुरेश भट. Show all posts

Monday, November 19, 2012

उषःकाल होता होता


उषःकाल होता होता, काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली
आम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी

कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली
तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली

उभा देश झाला आता एक बंदीशाला
जिथे देवकीचा पान्हा दूधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली

धुमसतात अजुनि विझल्या चितांचे निखारे
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली

गीतकार :सुरेश भट
गायक :आशा भोसले
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर

Monday, October 29, 2012

हे बरे नाही

हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही

जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही

ऐक तू ज़रा माझे…सोड मोह स्वप्नांचा
आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही

जाहली न कोणाची सांग राखरांगोळी ?
आपुलीच रांगोळी काढ़णे बरे नाही

आज मोकळे बोलू ! आज मोकळे होऊ !
जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही

कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता…
हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही

मैफिलीत या माझ्या पहातेस का खाली ?
हाय, लाजणारयाने जागणे बरे नाही…

- सुरेश भट

Monday, September 3, 2012

रिक्त

उगिच बोलायचे, उगिच हासायचे
उगिच कैसेतरी दिवस काढायचे

मधुन जमवायचे तेच ते चेहरे
मधुन वाऱ्यावरी घरच उधळायचे

चुकुन अपुली कधी हाक ऐकायची
मन पुन्हा बावरे धरुन बांधायचे

रडत राखायची लोचने कोरडी
सतत कोठेतरी भिजत धुमसायचे

उगिच शोधायचे भास विजनातले
अटळ आयुष्य हे टळत टाळायचे

ह्या इथे ही तृषा कधि न भागायची
मीच पेल्यातुनी रिक्त सांडायचे!

- सुरेश भट

Saturday, June 16, 2012

रोपटे

काय जे समजायचे ते शेवटी समजून गेलो,
मी तुझ्या आशेत सारी जिंदगी उधळून गेलो

चारचौघांसारखे मज बोलणे जमलेच नाही,
सांग तू आता शहाण्या, काय मी बरळून गेलो?

मी अता घेणार नाही माप श्वासांच्या गजांचे...
जन्मठेपेतून माझ्या आज मी निसटून गेलो.

का तुम्ही ठेवाल माझी याद येणाऱ्या पिढ्यांनो?
मी तुम्हासाठीच तेव्हा कोरडा बहरून गेलो

आज कैशी आपुली ही भेट ताटातूट झाली?
भेटतांना ऐन वेळी मी कुठे हरवून गेलो?

मी चुका केल्या तरीही काय हे नाही पुरेसे?
मी करोडो माणसांची अंतरे उजळून गेलो

जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला-
मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो

कवी - सुरेश भट

Thursday, May 31, 2012

वणवण

रुणझुणत राहिलो, किणकिणत राहिलो,
जन्मभर मी तुला 'ये' म्हणत राहिलो|

सांत्वनांना तरी हृदय होते कुठे?
रोज माझेच मी मन चिणत राहिलो|

ऐकणारे तिथे दगड होते जरी,
मीच वेड्यापरी गुणगुणत राहिलो|

शेवटी राहिले घर सुनेच्या सुने...
उंबऱ्यावरच मी तणतणत राहिलो|

ऐनवेळी उभे गाव झाले मुके;
मीच रस्त्यावरी खणखणत राहिलो|

विझत होते जरी दीप भवतालचे,
आतल्या आत मी मिणमिणत राहिलो|

दूर गेल्या पुन्हा जवळच्या सावल्या
मी जसाच्या तसा रणरणत राहिलो|

मज न ताराच तो गवसला नेमका...
अंबरापार मी वणवणत राहिलो|


कवी - सुरेश भट

Tuesday, May 1, 2012

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी



लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढया जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलींत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशांत दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी


कवी- सुरेश भट