Monday, February 24, 2014

घरोट

देवा, घरोट घरोट तुझ्या मनांतली गोट
सर्व्या दुनियेचं पोट घरीं कर्माचा मरोट
अरे, घरोट घरोट वानी बाम्हनाचं जातं,
कसा घरघर वाजे त्याले म्हनवा घरोट

अरे, जोडतां तोडलं त्याले तानं म्हनू नहीं
ज्याच्यांतून येतं पीठ त्याले जातं म्हनूं नहीं
कसा घरोट घरोट माझा वाजे घरघर
घरघरींतून माले माले ऐकूं येतो सूर

त्यांत आहे घरघर येड्या, आपल्या घराची
अरे, आहे घरघर त्यांत भर्ल्या आभायाची
आतां घरोटा घरोटा दयन मांडलं नीट
अरे, घंट्या भरामधीं कर त्याचं आतां पीठ

चाल घरोटा घरोटा तुझी चाले घरघर
तुझ्या घरघरींतून पीठ गये भरभर
जशी तुझी रे घरोटा पाऊ फिरे गरगर
तसं दुधावानी पीठ पडतं रे भूईवर

अरे, घरोटा घरोटा तुझ्या माकनीची आस
माझ्या एका हातीं खुटा दुज्या हातीं देते घांस
अरे, घरोटा घरोटा घांस माझा जवारीचा
तुले सनासुदी गहूं कधीं देते बाजरीचा

माझा घरोट घरोट दोन दाढा दोन व्होट
दाने खाये मूठ मूठ त्याच्यातून गये पीठ
अरे, घरोटा घरोटा माझे दुखतां रे हात
तसं संसाराचं गानं माझं बसते मी गात

अरे, घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठी
तसं तसं माझं गानं पोटातून येतं व्होटीं
दाने दयतां दयतां जशी घामानं मी भिजे
तुझी घरोटा घरोटा तशी पाऊ तुझी झिजे

झिजिसनी झिजीसनी झाला संगमरवरी
बापा, तुले टाकलाये टकारीन आली दारीं !

 – बहिणाबाई चौधरी

Monday, February 17, 2014

दया नही मया नही

दया नही मया नही, डोयाले पानी
गोगलगायच्या दुधाचं काढा वो लोनी

केसावार रुसली फनी
एकदा तरी घाला माझी येनी

कर्‍याले गेली नवस
आज निघाली आवस

आग्या टाकीसनी चुल्हा पेटत नही
टाया पिटीसनी देव भेटत नही

पोटामधी घान, होटाले मलई
मिय्याच्या तांब्याले भाइरून कल्हई

तवा खातो भाकर, चुल्हा भुकेला
पव्हारा पेतो पानी, राहाट तान्हेला

मानसानं घडला पैसा
पैशासाठी जीव झाला कोयसा

मानूस मोठा हिकमती, याचं घोंगडं त्याच्यावर
दगडाचा केला देव शेंदूराच्या जीवावर

डोयाले आली लाली
चस्म्याले औसदी लावली

वडगन्याले ठान नही
घरकोंबड्याले ग्यान, नही घरजवायाले मान नही

म्हननारानं म्हन केली
जाननाराले अक्कल आली

– बहिणाबाई चौधरी

Monday, February 10, 2014

राजा शेतकरी

जसा बोल्यले कर्रय तसा कामाले करारी
सभावानं मन मोका असोद्याचा शेतकरी

कारामधी रोखठोक नही उसनउधारी
दोन देये दोन घेये असा राजा शेतकरी

असा राजा शेतकरी चालला रे आढवनी
देखा त्याच्या पायाखाले काटे गेले वाकसनी

बोरू चाले कुरुकुरु तश्या पाट्या पेनाशिली
पोर्‍हं निंघाले शिक्याले कधीमधी टांगटोली

हाया समोरची शाया पोर्‍हं शायीतून आले
हुंदडत हायाकडे ढोरं पान्यावर गेले

अरे असोद्याची शाया पोर्‍हं शंबर शंबर
शायामधी भारी शाया तिचा पह्यला नंबर

इमानानं शिकाळती तठी ‘आबा’ मायबाप
देती अवघ्याले इद्या भरीभरीसनी माप

 – बहिणाबाई चौधरी

Monday, February 3, 2014

जिवाभावाचे सखेसोबती

तसे तर शब्द जिवाभावाचे सखेसोबती
श्वासोच्छ्वासाइतके मला निकटचे क्षणोक्षणी
शब्दांच्या आधारानेच सोसत आले आजवर
प्रत्येक आनंद, आघात, आयुष्यातली अधिक उणी

अजूनही जेव्हा मन भरुन येते अनिवार
करावे वाटते स्वत:ला शब्दांपाशी मोकळे
वाटते, त्यांनाच जावे सर्वस्वाने शरण
तेच जाणून घेतील आतले उत्कट उमाळे

तरीही शब्द हाताळताना असते सदैव साशंक
त्यांच्या सुक्ष्म नसा, भोवती धगधगणारा जाळ,
काळीज चिरीत जाणा-या त्यांच्या धारदार कडा
ज्या अवचित करतात विद्ध, रक्तबंबाळ

मी तर कधीचीच शब्दांची. ते कधी होतील माझे?
त्यांच्याशिवाय कुठे उतरू हृदयावरचे अदृश्य ओझे?

- शांता शेळके