Monday, January 27, 2014

बरसात

संबंधांचे अर्थ कधीच लावू नयेत
त्यांचा फक्त नम्र कृतज्ञतेने स्वीकार करावा
जसा पाण्याचा झुळझुळनितळ जिव्हाळा
जुळलेल्या समंजस ओंजळीत धरावा.

संबंधांचे धागे कधीच उलगडू नयेत
ते फक्त प्राणांभोवती सहज घ्यावेत लपेटून,
जसे हिवाळ्यातल्या झोंबऱ्या पहाटगारठ्यात
अंगांगी भिनवीत राहावे कोवळे धारोष्ण ऊन्ह.

संबंध तुटतानाही एक अर्थ आपल्यापुरता….
एक धागा… जपून ठेवावा खोल हृदयात
एखादे रखरखीत तप्त वाळ्वंट तुडवताना
माथ्यावर आपल्यापुरती खासगी बरसात…

 – शांता शेळके

Monday, January 20, 2014

कविता

शेवटची ओळ लिहीली
आणि तो दूर झाला
आपल्या कवितेपासून
बराचसा थकलेला
पण सुटकेचे समाधानही अनुभवणारा
प्रसूतीनंतरच्या ओल्या बाळंतीणीसारखा
जरा प्रसन्न, जरा शांत
नाही खंत, नाही भ्रांत….

आणि ती कविता नवजात
एकाकी, असहाय, पोरकी
आधाराचे बोट सुटलेल्या
अजाण पोरासारखी
भांबावलेली, भयभीत,
अनुभवणारी एका उत्कट नात्याची
परिणती विपरीत

ती आहे आता पडलेली
कागदाच्या उजाड माळावर
आपल्या अस्तिवाचा अर्थ शोधत
तो मैलोगणती दूर, वेगळ्या विश्वात
संपूर्ण, संतुष्ट, आत्मरत!

 – शांता शेळके

Monday, January 13, 2014

लाडकी बाहुली

लाडकी बाहुली होती माझी एक

मिळणार तशी न शोधूनी दुसऱ्या लाख

किती गोरी गोरी गाल गुलाबच फुलले

हासती केसही सुंदर काळे कुरळे

अंगात शोभला झगा रेशमी लाल

केसांवर फुलले लाल फितीचे फूल

कितीतरी बाहुल्या होत्या माझ्या जवळी

पण तीच सोनुली फार मला आवडती

मी तिजसह गेले माळावर खेळाया

मी लपुनी म्हटले साई-सूट्यो या या

किती शोध-शोधली परी न कोठे दिसली

परतले घरी मी होऊन हिरमुसलेली

वाटते सारखे जावे त्याच ठिकाणी

शोधूनी पहावी पुन्हा पुन्हा ती चिमणी

जाणार कशी पण पाऊस संततधार

खल मुळी न तिजला वर झोंबे फार

पाऊस उघडता गेले माळावरती

गवतावर ओल्या मजला सापडली ती

कुणी गेली होती गाय तुडवूनी तिजला

पाहुनी दशा ती रडूच आले मजला

मैत्रिणी म्हणाल्या काय अहा हे ध्यान

केसांच्या झिपऱ्या रंगही गेला उडून

पण आवडली ती तशीच मजला राणी

लाडकी बाहुली माझी माझी म्हणुनी

- शांता शेळके

Monday, January 6, 2014

मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले

मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले
जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले
जखम जिवाची हलके हलके भरून यावी
तसे फिकटले, फिकट रंग ते मग ओसरले

घेरित आल्या काळोखाच्या वत्सल छाया
दुःखाचीही अशी लागते अनवट माया
आक्रसताना जग भवतीचे इवले झाले
इवले झाले आणिक मजला घेरित आले

मी दुःखाच्या कुपीत आता मिटते आहे
एक विखारी सुगंध त्याचा लुटते आहे
सुखदुःखाच्या मधली विरता सीमारेषा
गाठ काळजातली अचानक सुटते आहे

जाणिव विरते तरीही उरते अतीत काही
तेच मला मम अस्तित्वाची देते ग्वाही
आतुरवाणी धडधड दाबून ह्रुदयामधली
श्वास आवरून मन कसलीशी चाहुल घेई

हलके हलके उतरत जाते श्वासांची लय
आता नसते भय कसले वा कसला संशय
सरसर येतो उतरत काळा अभेद्य पडदा
मी माझ्यातून सुटते, होते पूर्ण निराशय

 – शांता शेळके