Monday, June 24, 2013

रात्रही का वैऱ्याचीच, घालशील गा जन्माला!

ओठांवर आली पूजा, भरे मनांत कापरें
ओल्या पापांची वाळून, झालीं वातड खापरें
पापांतून पापाकडे , जाई पाप्याचा विचार
आणि पुण्याचीं किरणें, लोळतात भुईवर
माथीं घेतलें गा ऊन, कटींखांदीं काळेंबेरें
तुझ्या आवडीचा क्षण, डोळ्यांतून मागे फिरे
गढूळला तोही क्षण, मतलबाच्या मातीने
कैसें पोसावे त्यांवर, आर्द्र स्वप्नांना स्वातीने
घडय़ाळांत आता फक्त, एक मिनिट बाराला
रात्रही का वैऱ्याचीच, घालशील गा जन्माला!
-बा. सी. मर्ढेकर

Monday, June 17, 2013

दवांत आलीस भल्या पहाटी

दवांत आलीस भल्या पहाटी
शुक्राच्या तोऱ्यात एकदा,
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
तरल पावलांमधली शोभा

अडलिस आणिक पुढे जराशी
पुढे जराशी हसलिस; - मागे
वळुनि पाहणे विसरलीस का?
विसरलीस का हिरवे धागे?

लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा,
सुंदरतेचा कसा इशारा;
डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
सांग धरावा कैसा पारा!

अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मीची द्यावी सांग;
कोमल ओल्या आठवणींची
एथल्याच जर बुजली रांग!

तळहाताच्या नाजुक रेषा
कुणि वाचाव्या, कुणी पुसाव्या;
तांबुस निर्मल नखांवरी अन
शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या!

दवांत आलिस भल्या पहाटी
अभ्राच्या शोभेत एकदा;
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
मंद पावलांमधल्या गंधा.
-बा. सी. मर्ढेकर

Monday, June 10, 2013

किती पायी लागू तुझ्या

किती पायी लागू तुझ्या
किती आठवू गा तूंते
किती शब्द बनवू गा
अब्द अब्द मनी येते

काय गा म्या पामराने
खरडावी बाराखडी
आणि बोलावी उत्तरे
टिनपट वा चोमडी

कधी लागेल गा नख
तुझे माझिया गळ्याला
आणि सामर्थ्याचा स्वर
माझिया गा व्यंजनाला !

-बा. सी. मर्ढेकर

Monday, June 3, 2013

ह्या दु:खाच्या कढईची गा

ह्या दु:खाच्या कढईची गा
अशीच देवा घडण असू दे;
जळून गेल्या लोखंडातहि
जळण्याची, पण पुन्हा ठसू दे
कणखर शक्ती, ताकद जळकट

मोलाची पण मलूल भक्ति
जशि कुंतीच्या लिहिली भाळी,
खिळे पाडुनि तिचे जरा ह्या
कढईच्या दे कुट्ट कपाळी
ठोकुनि पक्के, काळे, बळकट

फुटेल उकळी, जमेल फेस,
उडून जाइल जीवन-वाफ;
तरि सांध्यांतुन कढईच्या ह्या
फक्त बसावा थोडा कैफ
तव नामाचा भेसुर धुरकट.
- बा. सी. मर्ढेकर