Monday, May 27, 2013

अडखळे लिहिताना

अडखळे लिहिताना
हात कधी अवचित
आणि निरखून डोळे
पहातात अक्षरात

कानावेलांटीचा डौल,
मोड तशी अक्षराची
कधी द्यावी, कधी नाही
रेघ अक्षरावरची

नकळत उमटली
कुणाची ही काय तऱ्हा
इवल्याशा रेषेमाजी
भावजीवनाचा झरा

नव्हेतच अक्षरे ही;
स्मृतीसुमनांचे झेले
एकाएका अक्षरात
भावगंध दरवळे

म्हणूनीच लिहिताना
अवचित थांबे हात;
धुके तसे आसवांचे
उभे राही लोचनांत

- इंदिरा संत

Monday, May 20, 2013

कढ

कुणी निंदावे त्यालाही
करावा मी नमस्कार
कुणी धरावा दुरावा
त्याचा करावा सत्कार

काही वागावे कुणीही
मीच वागावे जपून
सांभाळण्यासाठी मने
माझे गिळावे मीपण

कित्येकांना दिला आहे
माझ्या ताटातील घास,
कितिकांच्या डोळ्यातील
पाणी माझ्या पदरास!

आज माझ्या आसवांना
एक साक्षी ते आभाळ
मनातील कढासाठी
एक अंधार प्रेमळ

- इंदिरा संत

Monday, May 13, 2013

सांगावा

किती धाडला सांगावा:
मला येऊनिया न्यावे;
चोळमोळा झाला जीव,
किती त्याला शिणवावे!

किती पाहिली मी वाट
असे सांगावे धाडून;
केली कितीद तयारी
सारे काही आवरून

अंगणात संमार्जन,
दारा सतेज तोरण,
सारविल्या भुईवरी
स्वस्तिकाचे रेखाटण;

चूलबोळकी, बाहुल्या
दडपिल्या पेटाऱ्यांत;
लख्ख लख्ख सारे काही
निघायच्या तयारीत.

कसा नसेल पोचला
एक सांगावा येथून?
कसे नसेल ठाऊक
इथे मोजते मी क्षण?

दक्षिणेच्या झंझावाता,
कधी येणार धावत :
माझे मातीचे हे घर
कधी घेणार मिठीत?
- इंदिरा संत

Monday, May 6, 2013

माझी प्रीत

सुकुमार माझी प्रीत
रानातल्या फुलवाणी;
नको पाहू तिच्याकडे
रागेजल्या नयनांनी.

लाजरी ही माझी प्रीत
लाजाळूच्या रोपाहुन;
नको पाहू वाट तिची :
तूच घेई ओळखून.

मुग्ध मूक प्रीत माझी :
निर्झराची झुळझुळ;
नको पाहू उलगून
अस्फुटसे तिचे बोल.

अल्ल्लडशी प्रीत माझी :
सर तिला पाखराची;
तुझ्या मनी आढळली
जागा तिला निवा-याची.
- इंदिरा संत