Saturday, August 25, 2012

अशी ती

तो कधी येईल, कधी न येईलकधी भेटेल, कधी न भेटेल
कधी लिहिल, कधी न लिहिल
कधी आठवण काढील, कधी न काढील
असा तो. एक अनिश्चिती…………..
बंदिस्त घड्याळातील लंबकासारखी.
म्रूत्युसारखी.

त्या अनिश्चितीच्या ताणांच्या धाग्यात
तिचे पाय गुंतणार, काचणार……..
कोलमडणार….
पण तिने त्या रंगदार धाग्यांचा एक
पीळदार गोफ केला आणि त्याच्या झुल्यावर
उभी राहून ती झोके घेऊ लागली
या अस्मानापासुन त्या अस्मानापर्यंत
अशी ती एक मूक्ता
वार्यासारखी. जीवनासारखी.

- इंदिरा संत

Monday, August 20, 2012

सावळांच रंग तुझा

सावळांच रंग तुझा, पावसाळी नभापरी
आणि नजरेत तुझ्या, वीज खेळते नाचरी ॥ ध्रु ॥

सावळांच रंग तुझा, चंदनाच्या बनापरी
आणि नजरेत तुझ्या, नाग खेळती विखारी ॥ १ ॥

सावळांच रंग तुझा, गोकुळीच्या कॄष्णापरी
आणि नजरेत तुझ्या, नित्य नांदते पांवरी ॥ २ ॥

सावळांच रंग तुझा, माझ्या मनी झाकळतो
आणि नजरेचा चंद्र, पाहू केव्हा उगवतो ॥ ३ ॥

सावळाच रंग तुझा, करी जीवा बेचैन
आणि नजरेत तुझ्या, झालो गडे बंदिवान ॥ ४ ॥

-ग दि माडगुळकर

Wednesday, August 15, 2012

आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जन शासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

गीतकार :ग. दि. माडगुळकर
चित्रपट - घरकुल 

Monday, August 6, 2012

मृग

माउलीच्या दुग्धापरी
आले मृगाचे तुषार,
भुकेजल्या तान्ह्यासम
तोंड पसरी शिवार

तुकोबाच्या अभंगाला
मंद चिपळ्याची साथ,
भरारतो रानवारा
तसा झाडाझुडूपांत

पिऊनिया रानवारा
खोंड धांवे वारेमाप,
येतां मातीचा सुगंध
स्तब्ध झाले आपोआप

अवखळ बाळापरी
पक्षी खेळती मातींत,
उभारल्या पंखावरी
थेंब टपोरे झेलीत

धारा वर्षतां वरुन
बैल वशिंड हालवी,
अवेळीच फुटे पान्हा
गाय वत्साला बोलवी



-ग दि माडगुळकर